अज्ञातांचा विजय असो!




    गेल्या काही वर्षांत विशेषतः २-३ वर्षांत, "अज्ञात" हे नाव एक वेगळ्याच संदर्भात भारतीय जनतेच्या चर्चेत झळकायला लागलं आहे. यापूर्वी "अज्ञात" म्हणजे ओळख न पटलेली किंवा अंधारात राहिलेली व्यक्ति किंवा घटना अशी साधारण कल्पना होती. पण सध्या या शब्दाचं एक नवं रूप समोर आलं आहे — हे "अज्ञात" म्हणजे भारताच्या शत्रूंना ठार करत जगात शांतता राखण्यासाठी झगडणारे, पण स्वतःची ओळख गुप्त ठेवणारे एक गूढ बल.

या अज्ञात मंडळींनी गेल्या काही काळात अशा कित्येक दहशतवाद्यांना संपवलं आहे, जे भारतासाठी तसेच जगासाठीही एक मोठा धोका होते. लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजा याला नुकतेच अज्ञातांनी संपवलं. ही घटना एक टीप ऑफ द आइसबर्ग आहे. याआधीही अनेक वरिष्ठ दहशतवादी पाकिस्तानातच ठार झालेत. पण या सर्व घटनांमध्ये समान धागा म्हणजे हल्लेखोरांची ओळख कुठल्याही प्रकारे स्पष्ट झालेली नाही. कुठलीही जबाबदारी घेणारी संघटना नाही, कुठलाही पुरावा नाही — फक्त परिणाम दिसतो: भारताचे शत्रू नामशेष होतात.

या अज्ञात व्यक्ती कोण आहेत? यांचं शिक्षण, प्रशिक्षण, हेतू, संघटन — काहीच माहिती नाही. यांच्याकडे सरकारकडून थेट पाठबळ आहे का? याबाबतही भारत सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. तरीही या घटनांच्या परिणामांची तीव्रता इतकी आहे की, पाकिस्तानच्या सुरक्षायंत्रणांनीही हात टेकले आहेत. आयएसआय, पाकिस्तानी पोलिस, दहशतवादी गट — हे सर्वजण या हल्ल्यांमुळे हादरलेत. जेव्हा सशस्त्र हल्लेखोर घरात घुसून एखाद्याला ठार करतो, तेव्हा त्याचं गूढ भयदायक आणि थरारक वाटतं. आणि "अज्ञात" हे गूढ आज पाकिस्तानच्या प्रत्येक दहशतवाद्याला झोपेतून घाबरून उठायला लावतं.

अलीकडच्या घटनांनी हेही स्पष्ट झालं आहे की भारत आता फक्त संरक्षणाच्या भुमिकेत राहिलेला नाही, तर आक्रमक संरक्षणाच्या दिशेने पावलं टाकतोय. अर्थात हे "अज्ञात" सरकारी अंगठ्याखाली नसले, तरी भारताच्या हितसंबंधात काम करत असल्याचं चित्र उभं राहतं. पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची बनली आहे — सीमेवर भारतीय सैन्य, आंतरराष्ट्रीय दबाव, बलुचिस्तानचं स्वतंत्रतेकडे झुकणं, आणि आतून अज्ञात हल्लेखोरांचा विळखा.

पाकिस्तानसाठी ही परिस्थिती म्हणजे चारही बाजूंनी विळखा. उघड्यावर आलो तर भारतीय सैन्य, मागे हटलो तर बलुच लढवय्ये, घरात लपलो तरी अज्ञात! जायचं तरी कुठे? हीच खरी अडचण आहे. यामुळे पाकिस्तानी यंत्रणा प्रचंड अस्वस्थ आणि असमर्थ झालेल्या आहेत.

या सर्व परिस्थितीत भारताला कोणताही थेट युद्ध न करता मोठा फायदा मिळतो आहे. शत्रूंना योग्य तो प्रत्युत्तर मिळतंय आणि त्यांचं मनोबल खचतंय. सुंठी वाचून खोकला जातोय अशीच काहीशी गत पाकिस्तानची झाली आहे.

"अज्ञात" ही संज्ञा आता केवळ एक नाव राहिलेली नाही — ती एक रणनीती आहे, एक छायायुद्ध आहे आणि भारताच्या रक्षणासाठी लढणारी एक अदृश्य शक्ती आहे.

देवा, अज्ञातांचं भल कर! 

✍️ केतन सावंत

Post a Comment

0 Comments