कृष्णा


(हि कथा मी लिहिलेली नाही. पंधरा वर्षांपूर्वी वसंतश्री नावाच्या दिवाळी अंकात हि होती. जशी आठवली तशी लिहिली आहे)


"सात्यकी SS"
"अरे सात्यकी काय चाललंय तुझं?"
"काही नाही ग आई इथेच खेळतोय"
सात्यकी एक दहा वर्षाचा मुलगा. वडील शेतावर कामात असताना फुरस चावून दोन वर्षांपूर्वी गेले. नाही म्हणायला एक मावशी होती पण ती गावाच्या शेजारीच दुसऱ्या गावात राहत होती. वळसा घालून जायचं म्हटलं तर अख्खा दिवस जायचा पण जंगलाच्या वाटेनं माणूस सूर्य कासराभर वर यायच्या आत घरात येईल. पण तितकाच जीवघेणा. जंगली श्वापद, जनावर सगळे दिवसरात्र जंगलात आपलं अस्तित्व दाखवून द्यायचे.
गावातले चार तरणी बांड पोर अशीच जवळचा रस्ता म्हणून जंगलाच्या रस्त्यानं जायला निघाली आणि भर दुपारी उपाशी वाघानं खाल्ली. चार कुटुंबाचे दिवे विझले. नाही म्हणायला ह्या गोष्टीला आता दहा वर्ष झालाय होती. गावात रहदारी वाढली. लोकसंख्या वाढली पण अधून मधून गावाच्या पाणवठयावर वाघाचं दर्शन होत होत. गावच्या मंदिराजवळ कोल्हेकुई ऐकू येत होती. सौर उर्जेवर चालणारे दिवे रात्र झाली कि आपोआप आपला उजेड मिटून घ्यायचे.
ह्या आटपाट नगरात सार काही आलबेल चालू होत. अभिमन्यू हा सात्यकीचा मोठा भाऊ. त्याच्याहून पाच वर्षांनी मोठा. नाही म्हणायला गावात सरपंचाच्या हाताखाली राहून तो पोट भरण्यासाठी पैसे कमवायचा. एकदा सात्यकीच्या मावशीकडे एक कार्यक्रम होता. घरातून पैशाची नाहीतर निदान एक मोठा ताम्ब्या भर दही तुला घरच्या गाईच्या दुधापासून बनवलेलं पाठवीन असा निरोप सात्यकीच्या आईने पाठवला होता. वसंत ऋतूला सुरवात व्हायच्या आधी कार्यक्रम होणार होता. त्यामुळे सात्यकीच्या आईने घरात दूध साठवून विरजण लावायला सुरुवात केली होती. कार्यक्रमाचा दिवस उजाडला तसा सात्यकीला आईने अभिमन्यू सोबत मावशीच्या घरी उद्यापासून आठवडाभर रोज सकाळी दही पोहोचवायचं सांगितलं. दादा सोबत सात्यकी आधीसुद्धा जंगलाच्या रस्त्याने मावशीच्या घरी जाऊन आला होता. पण त्याच्या कोवळ्या मनाला ती भली थोरली झाड, मधेच उठणारे आवाज घाबरवायचे. दोन दिवस झाले अभिमन्यू सात्यकीला घेऊन मावशीच्या घरी दूध देऊन येत होता. त्याच दिवशी तो घरात बसला होता तेव्हा सरपंचाकडून बोळवण आलं आणि उद्यापासून कामावर हजर राहण्याचा हुकूम आला.
आता उद्यापासून दही मावशीकडे पाठवण्याचा यक्ष प्रश्न उभा राहिला. लावणीचं काम असल्याने सात्यकीची आई स्वतः जाऊ शकत नव्हती आणि आता अभिमन्यूपण जाऊ शकत नव्हता तितक्यात बाहेर खेळणारा सात्यकी चेंडू घरात आला म्हणून तो चेंडू घेण्यासाठी घरात आला आणि तिचे डोळे चमकले. रात्र झाली आणि जेवण आटपून अंथरून घातल्यावर सात्यकी नेहमीप्रमाणे आईच्या कुशीत शिरला. तेव्हा ती त्याला म्हणाली
"सात्यकी बघ आपली परिस्थिती तुला ठाऊक आहे. आणि तू माझा शूर बाळ आहेस. मी आणि तुझा दादा कामामुळे मावशीकडे जाऊ शकत नाही आणि आपण तिला सांगितलं आहे कि रोज दही पोहोचवू. तिची बोट त्याच्या केसातून फिरत होती. तो हातातल्या चेंडूशी खेळत होता. उद्या मावशीकडे एकट्याने जावं लागणार हे कळलं तास त्याच्या हातातला चेंडू पडला आणि घरंगळत जाऊन भिंतीला टेकवून उभय केलेलय जात्याच्या मागे जाऊन अडकला. तो आईकडे पाहत होता.
"सात्यकी तुला भीती वाटते का?"
"हं" एवढंच उत्तर दिल आणि तो तिला घट्ट बिलगला.
"सात्यकी मी तुला सांगू मला कधी भीती वाटली ना तर मी त्या कृष्णाला हाक मारते. मग मी कुठेही असेन तो मला येऊन मदत करतो."
"म्हणजे?" सात्यकी आईच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे पाहत होता. अभिमन्यू दिवसभरच्या कामामुळे दमून थकून झोपी गेला होता.
"म्हणजे असं कि मला जेव्हा वाटत कि आता घरात खायला दाणा नाही आणि पैसे पण संपले असतील तेव्हा मी त्या कृष्णाला हाक मारते आणि तो कुठूनही येऊन मला मदत करतो. म्हणजे तोच येईल असं नाही पण कोणी ना कोणी येऊन धान्य देऊन जात, उरलेले पैसे देऊन जात. पण कधी कुणापुढे त्याने लाचार नाही होऊन दिल.
उद्या तू जाशील ना पण तुला काही वाटलं तर बिनधास्त कृष्णाला हाक मार तो तुला सोबत करेल"
"तो मला सोबत करेल?"
"हो, तू एवढा गोड आहेस तो नक्की तुला मदत करेल"
तितक्यात गावात दुसऱ्या आळीतून वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. पाठोपाठ सारा गाव जागा झाला. सखा काकाचा अंगणात झोपलेला कुत्रा वाघानं पळवला होता. पण त्या डरकाळीने सात्यकी आईच्या कुशीत घट्ट शिरून डोळे मिटून होता. त्याला डोकं वर करायचा धीर नव्हता. तो तसाच झोपून गेला त्याच्या आईची बोट त्याला थोपटत होती.
सकाळ झाली तसा सात्यकी उठला आणि तयार होऊन न्याहारीला बसला. चटणी भाकरी खाऊन त्याने धारोष्ण दुधाचा पेला तोंडाला लावला. देवाचे आभार मानू तो उठला आणि आईने कापडाने झाकलेला एक दह्याने भरलेला तांब्या हातात दिला. तसा त्याला कालचा वाघाच्या डरकाळीचा आवाज त्याच्या कानात घुमला. सखा काकाच्या अंगणातूनच जंगलाचा रस्ता जात होता. तिथे पोहोचल्यावर त्याला रक्ताचे डाग दिसले. तसा आवंढा गिळून त्याने पुढे पाय टाकला आणि जंगलाचा रस्ता पकडला. जंगलात गेला तसा त्याच्या पायावरून एक साप सरसरत पुढे गेला. त्या थंडगार स्पर्शाने त्याला उभ्या जागी घाम फुटला आणि आईने सांगितल्या प्रमाणे तो कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारू लागला.
"कृष्णाS, कृष्णाSS " कुठून काहीच प्रतिसाद येत नव्हता.
पुन्हा त्याने हाक मारली "कृष्णाS, अरे कृष्णाSS"
तितक्यात पाठीवर एक हात आल्यासारखा त्याला वाटलं. त्याने वळून वर बघितलं. खरोखरच कृष्ण उभा होता. त्याच्या अभिमन्यू दादाच्या वयाचाच. हातात एक बासरी. सात्यकीला क्षणभर विश्वासच बसत नव्हता. तो आ वासून त्याच्याकडे पाहत होता.
"काय झालं सात्यकी?"
"तू कृष्ण..!"
"हो, आता तू इथं कृष्ण म्हणून हाका मारत होतास मग मलाच यावं लागल"
"तू खरच कृष्ण आहेस"
"हो... अरे माझ्या आईबाबांनी माझं नाव कृष्ण ठेवलं जस तुझं सात्यकी"
चालत चालत दोघे मावशीच्या गावाच्या वेशीवर आले तसा कृष्ण म्हणाला
"आता तू जाऊन हे दही मावशीच्या घरी देऊन ये मी थांबतो इथेच"
"बरं" म्हणून सात्यकी गेला आणि थोड्यावेळात परत आला.
"चल" सात्यकी कृष्णाला म्हणाला.
"एक विचारू का?"
"मी तुला काय हाक मारू? नाही म्हणजे तू माझ्या दादाच्या एवढा मोठा आहेस म्हणून विचारलं"
"तुला आवडेल ती हाक मार..."
"कृष्णादादा म्हणू? चालेल तुला"
"आवडेल मला" कृष्णाने आपला हात सात्यकीच्या डोक्यावर ठेवला.
पुन्हा दोघे परतीच्या रस्त्यावर येत होते.
सखा काकाच घर दिसू लागलं तसा कृष्ण सात्यकीला म्हणाला
"चल आता मी येतो... आता तू जाशील कि इथून"
"हो.. पण पुन्हा कधी भेटणार?"
"तू हाक मारशील तेव्हा"
"बरं.." म्हणून सात्यकी उड्या मारत जंगलाच्या बाहेर गेला...
आता दुसऱ्या दिवसापासून सात्यकी जंगलात गेला कि कृष्णाला हाक मारायला लागला.. आणि कृष्णाने येऊन त्याला सोबत करावी हे नित्याच झालं.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सात्यकी कृष्णासोबत गावाच्या वेशीपर्यंत आल्यावर एकटाच मावशीच्या घरी दही द्यायला गेला. तेव्हा मावशीनं त्याला तिथंच थाम्बवून घेतलं. आणि विचारलं. सात्यकी तू घाबरत नाहीस का आता एकटा यायला?
"नाही मावशी.. कृष्णादादा असतो ना सोबत"
"कोण रे?"
"आग तो नाही का जंगलात राहतो तो"
"आता पण तो गावाच्या वेशीवर थांबलाय.. मला भीती वाटते ना एकट्याला जंगलातून जाताना मग तो मला सोबत करतो"
"सात्यकी खरं सांग बघू... तू दही आणतोस एक तांब्या भर आणि अख्खा कार्यक्रम झाला तरी ते दही पुरून उरत..असं कस होऊ शकत?"
"सात्यकी खरं सांग.. कोण आहे तो कृष्णा?.. तुला कुठे भेटला?"
"अग अभिमन्यू दादाला कामावर जावं लागलं आणि मला एकट्याला यावं लागणार होत मग आई म्हणाली घाबरलास तर कृष्णाला हाक मार तो सोबत करेल तुला.. मग मी जंगलात गेलो आणि त्याला हाक मारल्यावर तो आला.. आता पण माझ्यासाठी थांबलाय तो.. चल येतो मी"
"अरे थांब.. आम्ही पण येतो तुझ्यासोबत.. आम्हाला पण भेटायचंय तुझ्या ह्या कृष्णाला"
"चल.. "
गावच्या वेशीवर असलेल्या उंबराच्या झाडाखाली कृष्णा नेहमी सात्यकीची वाट पाहायचा.. तिथं सात्यकी आला तर त्याला कोणी दिसलं नाही.. तो अजून थोडा पुढे गेला.. तरी कोणी दिसलं नाही. त्याच्या मागोमाग सारे सोबत आलेले चालत होते.. जंगलाच्या मध्यावर आले तरी कृष्णाचा काही पत्ता नव्हता.. सात्यकी मात्र "कृष्णादादाSS... कृष्णादादा" म्हणून हाक मारत होता.. पण आता सात्यकीची जबाबदारी पूर्ण झाली होती आणि कृष्णाची सोबतहि.. त्या जंगलात मात्र अजूनही सात्यकीला कृष्णादादाच्या बासरीची धून ऐकू येते..



Post a Comment

0 Comments