महाराष्ट्र म्हटलं कि इतिहास, भूगोल आणि कितीतरी समृद्ध गोष्टींनी भरलेला, नटलेला हा दख्खनचा भूभाग आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे कोकण किनारपट्टी असो, किंवा महाबळेश्वरचा थंडपणा, कळसूबाईची उंची, अरबी समुद्राची विशालता आणि किती किती म्हणून सांगू!
इतिहास म्हटलं कि एक नाव प्रत्येक महाराष्ट्र वासियांच्या डोळ्यात, मनात आणि ओठावर येत आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! आपल्या अफाट पराक्रमाने ह्या गुलामगिरीत पिचलेल्या ह्या भूमीला मुक्त करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला आणि ह्या भारताला जी मरगळ आली होती ती झटकून अनेक तरुण तरुणी ह्या स्वातंत्र्य समरात भाग घेऊ लागले.
पुढे ब्रिटिशांनी व्यापाराच्या दृष्टीने ह्या भूमीत पाय रोवायला सुरुवात केली आणि तिथेच घात झाला. पुन्हा आपण पारतंत्र्यात लोटले गेलो पण तेव्हा सुद्धा हा स्वातंत्र्याचा यज्ञ धगधगत होता आणि त्यात पहिली आहुती पडली ती वासुदेव बळवंत फडके, मग खुदिराम बोस, चाफेकर बंधू आणि मग हि शृंखला सुरूच राहिली. दीडशे वर्ष! तब्ब्ल दीडशे वर्ष ह्या भारतातल्या लोकांच्या घरातले वंशाचे दिवे विझत होते, स्त्रिया विधवा होत होत्या, कुटुंब उध्वस्त होत होती आणि ह्यात एका कुटुंबातल्या पुरुषांनीच नव्हे तर स्त्रियांनीसुद्धा आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं होत ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर.. सावरकर कुटुंबाविषयी कुणाच्या मनात काय मत असतील ह्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पण त्यांनी छत्रपती शिवरायांवर लिहिलेली आरती त्यांच शिवरायांवर असलेलं प्रेम दर्शवते.
| स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर |
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी म्हणाले होते - सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तितिक्षा...
आज त्याच सावरकरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांवरची आरती तुमच्याशी शेअर करतोय.
जयदेव जयदेव जय शिवराया
या या अनन्य शरणा आर्या ताराया II धृ II
आर्यांच्या देशावर म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनि तव हृदय न का गेला? II १ II
श्री जगदंबा जीस्तव शुभादिक भक्षी
दशमुख मर्दूनी जी रघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता? II २ II
त्रस्त आम्ही दिन अम्ही शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन भगवद्गीता सार्थ कराया या II ३ II
ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्रीशिवनृपी गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता तो झाला
बोला ततश्रीमत्शीवनृप कि जय बोला II ४ II
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
सावरकर कोण होते हे जाणून घ्यायचं असले तर त्यांचं आत्मचरित्र वाचा!
हे आत्मचरित्र तुम्ही खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करून विकत घेऊ शकता.
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


0 Comments