प्रतापगडावरचा रांजण

_*प्रतापगडावरचा रांजण*_


कोयनेच्या खोऱ्यात आणि पार गावात आज धामधूम सुरु होती. कारण तस होत. अफझलखान मारल्यावर राजे राजगड मग तिथून पन्हाळा तिथून विशाळगड आणि आज किती महिन्यांनी भवानी आईच्या दर्शनाला येणार होते.

"आरं बिगी बिगी हात चालवा रं, राजं कवा बी येत्याल! आरं ये रंडीच्या ऐकतो का न्हाई!त्यो झेंडू ठिव बगू तिथं!" किल्लेदार सिधोजीराव सगळ्यांवर ओरडत होते. राजे राजगडाहून पहाटेच निघाले त्याची तोफ त्यांनी ऐकली तशी त्यांची चलबिचल अजून वाढली.

गडावर आज माणसं जमू लागली. सावकार, उदीम व्यापारी साऱ्यांनाच राजांना एकदातरी पाहावं असं झालं होत. अफाट देहाच्या त्या राक्षसाला दे माय धरणी ठाय करणारा राजा दिसतो तरी कसा हे पाहण्याची ओढ लागली होती. फक्त तेच नाही गावातली बाई बाप्ये, म्हातारे, पोरांना तर लंगोट बांधून असाच घेऊन आले होते. पार गावाहून ते थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत दुतर्फा लोक दाटी करून उभे होते.

पसरणीच्या घाटात धुळीचे लोट उठू लागले तसे सगळ्यांची चुळूबुळ चालू झाली. जो ओट एकमेकाला त्या दिशेने बोट करून दाखवू लागला

"राजं आलं राजं आलं" साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक आनंदाची लकेर उमटली. आणि धुळीचे लोट अगदी गावात शिरले तसे राजे थांबले. घोड्यावरून उतरले पाठोपाठ तानाजी, मोरोपंत हे देखील उतरले. तानाजीने पुढे होऊन राजांच्या घोड्याचे लगाम हाती घेतले. आजूबाजूला जमलेली गर्दी हि फक्त राजांच एकवार दर्शन घडावं त्याने आपल्याला बघावं म्हणून झाली होती. आणि राजे चालू लागले. सुवासिनींनी राजांना ओवाळलं.

बहुतां दिसांची आस पुरी झाल्याच्या भावना साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. किल्लेदार लगबगीने पुढे आला. महादरवाजा जवळ जाताच राजे थांबले आणि त्यांनी पुन्हा एकदा शामियाना उभारल्याच्या दिशेने नजर वळवली आणि गर्रकन फिरून ते आत गेले. थोड्यावेळात मोरोपंत आणि नेतोजी पालकर येऊन दाखल झाले. "काय मनसुबा पंत?"
"राजे आम्हाला थोडे बोलायचे होते!"
"बोला पंत..इजाजत कसली!"
"राजे ते भुयार...!"
"ते बुजवून टाका...खानाचा मुडदा त्यात घातला तेच ना"
"होय होय तेच"
शामियान्याच्या मागल्या अंगाला राजांनी एक भुयार खोदून घेतलं होतं ते थेट महादरवाजाच्या उजव्या अंगाला खुल होत होतं. खानाला मारल्यावर राजे त्याच भुयारातून गनिमाला न दिसता थेट किल्ल्यात पोहोचले होते. 

"सरनौबत.. येक गोष्ट ध्यानी आली नाही वाटतं आपल्या?"
"कंची राजं?"
"तो रांजण...आधी बाहेर काढून घ्या"
मोरोपंत दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहत होते.
"पंत आपणास ठावे नाही. पण भेटीच्या आदल्या दिवशीच भुयाराचे तोंड महादरवाज्यापाशी उघडताच तीत येक भला मोठा रांजण गावला. काय आहे आत ते ठावे नाही परंतु गडबडीत त्याचा निर्णय घेणे राहून गेले. म्हणून मग लगोलग आलो"
"आलं ध्यानी राजं"
"भोई पाठवून रांजण मागवून घ्या. आणि भवानीच्या देवळासमोर घेऊन या. आम्ही तिथेच भेटू तुम्हास!"
"जी राजं"

रांजणाच्या तोंडाच्या दोन्ही बाजूस कडीतून पितळेची सळई घालून तोंड गच्च बंद केलं होतं. राजांनी एकदा चहुबाजूंनी रांजण पाहिला आणि उपाध्यायांनी दिलेलं हळद कुंकू त्यावर अर्पण केलं. मग राजांच्या आज्ञेनुसार हातोडीने दोन्ही सळ्या काढून टाकल्या आणि लख्ख पिवळा धम्मक प्रकाश साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला. 
"राजे शुभ शकुन" उपाध्याय म्हणाले
"जी...भेटीच्या आदल्या रात्रीच आई भवानीने हा प्रसाद दिला. परंतु प्रसंग असा बाका गुदरला होता की यावर विचार करण्यास सोय नव्हती. राजांनी त्यात हात घालून ओंजळभर सुवर्ण मोहोरा हाती घेतल्या आणि तसेच ते देवळात गेले. त्या मोहरा त्यांनी आई भवानीवर उधळल्या. "आई तूच येश दिलेस. पोराच्या मनीच गुज तू जाणलेस आन हा प्रसाद दिलास. आई हे येश तुज अर्पण. मी फक्त निमित्य! आई आई..आणि राजांची समाधी लागली. दोन्ही हात जोडल्या स्थितीतच राजे औट घटका बसले, मग पुन्हा सदरेवर येऊन त्या मोहरांचा विनियोग सांगितला आणि येक रात्र गडावर राहून पुन्हा राजांची घोडी राजगडाच्या दिशेने उधळली...!

©केतन सावंत

Post a Comment

0 Comments