Nostalgic

         



        शाळा... हे एक नाव घेताच आठवणींचा अखंड प्रवाह डोळ्यांसमोर उभा राहतो. शाळा सुटल्यावर मी शेवटचा कधी शाळेत गेलो होतो, हे आठवत नव्हतं. दिवस गेले, वर्षं सरली, आणि आयुष्याच्या वेगवान प्रवासात शाळेच्या त्या चार भिंती मागे पडल्या. पण गेल्या शनिवारी काही कारणानं पुन्हा शाळेत जाणं झालं आणि तेव्हा खऱ्या अर्थानं "नॉस्टॅल्जिक" या शब्दाचा अर्थ समजला. एका ओळखीच्या जागी परत गेल्याने एवढ्या भावना उफाळून येतील, असं कधी वाटलंच नव्हतं.

शाळेच्या गेटमधून आत जाताना एक वेगळीच ऊर्जा जाणवली. अंगण ओलांडताना पावलांना ओळखीची वाट सापडली. जणू काही पाऊलवाट मला पुन्हा ओळखतेय, ओळखीच्या जागा मला पाहून आनंदित होत आहेत. जुन्या दिवसांच्या असंख्य आठवणी एकामागून एक डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. पाऊल पुढे टाकलं, आणि त्या जुन्या वर्गांकडे नजर वळली. पहिल्यांदा रडत रडत शाळेत आलो होतो, तो वर्ग—छोटा शिशु! त्या वर्गाच्या दारात उभा राहिलो, आणि मन काही क्षणांसाठी भूतकाळात जाऊन पोहोचलं. आज तिथे मोठा स्क्रीन आहे, ई-लर्निंगची सुविधा आहे, रंगीबेरंगी बोर्ड आहेत. पण त्या जमिनीत, त्या भिंतीत अजूनही माझ्या लहानपणीच्या खोडकर आठवणी दडलेल्या आहेत. बायकोला हळूच म्हणालो, "हा माझा वर्ग होता, छोटा शिशुचा."

पहिली ते चौथी देखील त्याच शाळेत होती. वर्गाच्या भिंतींना हात लावत होतो, आणि त्या जुन्या स्पर्शाची आठवण जागी होत होती. पुस्तक ठेवायचे कप्पे तसेच होते, फळा तोच, बेंचही तशाच होत्या. बसायला बेंचवर गेलो, आणि क्षणभर डोळे मिटले. १९९९ मध्ये शाळेचा उंबरा ओलांडला होता, आणि आज २५ वर्षांनी पुन्हा त्या जागेवर उभा होतो. काही क्षणासाठी काळ थांबल्यासारखा वाटला.


शाळेच्या भिंतींवर जुन्या आठवणी कोरलेल्या होत्या. त्या फळ्यावर आजही सुविचार लिहिलेला होता. एका कोपऱ्यात मॉनिटरनी मस्तीखोर मुलांची नावं लिहिली होती—अगदी आपल्या काळातल्यासारखं! मुलांनी बनवलेले प्रोजेक्ट्स अजूनही तिथेच होते. प्रत्येक वर्गात काहीतरी नवीन बदल झालेला असला, तरी त्या भिंतींमध्ये कितीतरी पिढ्यांच्या आठवणी जिवंत आहेत.

  आणि अचानक इतिहास शिकवणाऱ्या बाई दिसल्या - आमच्या माया बाई. एका क्षणासाठी मी थांबलो. ज्या बाईंमुळे मला इतिहासाची गोडी लागली, ज्या शिकवताना महाराजांचा जणू साक्षात अनुभव द्यायच्या, ज्या प्रत्येक प्रसंगाला जिवंत करायच्या—त्या बाई पुन्हा समोर होत्या! त्या वर्गात काम करत होत्या. मला पाहताच बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचा आनंद दिसला. बाईंना पाहून मला एकदम भरून आलं. खरंतर काही कारण नव्हतं, पण जुन्या आठवणींनी मन भारावून गेलं.

गप्पा झाल्या, आठवणी जाग्या झाल्या. पुस्तक लिहून झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलो होतो, पण फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणं व्हायचं. त्यांना पुस्तकाची प्रत द्यायची आहे असं ठरवलं, बघू कधी वेळ जुळून येतो. त्यांना सांगितलं, "बाई, आज लोक मला इतिहासाबद्दल लिहिणारा म्हणून ओळखतात, पण त्या आवडीचं मूळ तुम्ही आहात." त्या क्षणी बाई हलकंसं हसल्या, पण त्यांच्या डोळ्यात कौतुक आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. फक्त एकच गोष्ट राहून गेली—त्यांच्यासोबत फोटो काढायचा! पण काही आठवणी फक्त हृदयात कोरल्या जातात, आणि त्या कधीच पुसल्या जात नाहीत. त्या क्षणाला मिळालेली अनुभूती अधिक अनमोल होती.

त्या भिंती, तो फळा, ती शाळा—आजही तशीच उभी होती, फक्त त्यातल्या पिढ्या बदलल्या होत्या. पण त्या आठवणी... त्या तशाच होत्या, जशा मी त्या मागे ठेवल्या होत्या.

माझी शाळा - आशाताई गवाणकर प्राथमिक शाळा

शाळेच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात. काही आठवणी तुमच्याकडेही असतील. त्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. त्या वाचायला मला नक्कीच आवडतील! 😊


जाता जाता हे गाणं ऐका..

https://youtu.be/I3FF8F4iKlM?si=fqXqX5aMAyUkp7UJ

धन्यवाद 
केतन सावंत 

Post a Comment

5 Comments

  1. Kalyani Shinde1 April 2025 at 11:09

    खूप छान.
    मलाही शाळेत नेऊन ठेवलेस.
    बरीच वर्षे गेले नाही.
    आत्ता नक्की जाऊन येईन.
    जुन्या आठवणींना उजाळा द्यायला.

    ReplyDelete
  2. मन होतंच हळवं. तू लेखक असल्यामुळे ते शब्दबद्ध केलंस. छान वाटलं हे वाचताना.

    ReplyDelete
  3. केतन, किती छान आणि मनापासून लिहिलेस! खरंच अभिमान वाटतो तुझा!! आज इंग्रजी माध्यमाचे पेव फुटलेले असताना जाणीवपूर्वक तू तुझ्या लेकासाठी तुझीच मराठी शाळा निवडलीस!!!
    मराठीचे भवितव्य अशा भविष्याहाती असल्यास त्याची काळजी नको हा विश्वास वाटतो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. मी फक्त प्रयास केला

      Delete