युद्ध, बुद्धी आणि सजग नागरिकत्त्व – आपली खरी तयारी कुठे आहे?

      

          

            

         आज आपण पहलगाममधील भीषण घटनेमुळे व्यथित झालो आहोत. आपल्या शूर जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे अंत:करण हेलावलं आहे. या अशा घटनांमुळे सामान्य माणूससुद्धा "युद्ध कराss!" अशी साद घालतो, आणि ही भावना पूर्णपणे नैसर्गिक आहे. मी देखील मागच्या लेखात शत्रूला जबर उत्तर दिलं जावं अशी इच्छा व्यक्त केली होती, कारण इतक्या नीचपणे आपल्या बंधूंना मारल्यावर शिक्षा ही तितकीच क्रूर असलीच पाहिजे – ह्याबाबत माझं मत ठाम आहे.

पण ह्याच वेळी एक आठवण प्रकर्षाने झाली – ती म्हणजे डॉ. अनिरुद्ध जोशी यांचं पुस्तकतिसरे महायुद्ध. हे पुस्तक मी आधी वाचलं होतं, पण सध्याच्या परिस्थितीत काही मार्गदर्शन मिळेल का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा ते उघडलं. आणि नजरेस पडला "जैविक युद्ध" ह्या विभागातला शेवटचा संदेश:

"...आणि म्हणूनच शत्रूचे आक्रमण झाल्यास आमची पूर्ण तयारी असलीच पाहिजे, परंतु युद्धखोरपणाची किंवा चिथावणीची बेलगाम भाषा वापरून चालणार नाही."

ही ओळ खूप विचार करायला लावणारी आहे. भावनेत वाहून जाऊन "युद्ध हवं!" असं म्हणणं सोपं आहे, पण आपण प्रत्यक्षात तयार आहोत का?

सन त्झू आणि युद्धाचं खऱ्या अर्थाने शास्त्र

"आर्ट ऑफ वॉर" हे २५०० वर्षांपूर्वीचं पुस्तक लिहिणारा सन त्झू याचं एक वाक्य आहे –

सर्वोत्तम योद्धा तोच जो युद्ध न करता विजय प्राप्त करतो.

ही संकल्पना आपल्याला वेगळी वाटू शकते, पण ह्यातच खरा 'युद्धनीतीचा' गाभा आहे. आपल्यावर हल्ला झाला आहे, हा राग स्वाभाविक आहे. पण आपण इतकेही दुर्बल नाही की फक्त भावना दाखवून शांत बसावं लागेल. याच्या पलिकडे सज्जतेचा आणि योजनांचा विचार महत्त्वाचा आहे.

आपली वैयक्तिक आणि राष्ट्रीय सज्जता

आज मी युद्धाची भाषा करतोय, पण...

१) मी स्वतःसाठी कोणत्या आपत्ती व्यवस्थापन योजना तयार केल्या आहेत का?
२) माझ्या कुटुंबासाठी तत्काळ प्रतिसाद पद्धती आहेत का?
३) मी जैविक युद्ध, सायबर हल्ला, आर्थिक टाळेबंदी यांसारख्या युद्ध प्रकारांबद्दल जागरूक आहे का?
४) मी सरकारच्या किंवा सामाजिक संस्थांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत का?

युद्ध म्हणजे केवळ गोळ्या-तोफांचे आदानप्रदान नव्हे. आज युद्ध हे माहितीवर, तंत्रज्ञानावर, मनोबलावर आणि एकजुटीवर लढलं जातं.

आपण पाकिस्तानशी युद्ध हवं म्हणतोय पण ह्यामागचा खरा सूत्रधार चीनला मात्र आपण विसरतोय. गेली कित्येक दशक भारताचा घास घेण्यासाठी तळमळत असणारा आणि म्हणून भारत अस्थिर करून भारताचा आर्थिक कणा मोडण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या चीनकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही. भारताला यावेळेस अतिशय सावधपणे पावलं उचलायला हवी आहेत. आपलं सरकार सक्षम आहे परंतु आपण आपल्या अभ्यासाच्या कक्षा वाढवायला हव्यात. 

भारताची एवढी मोठी बाजारपेठ गमावणे कुठल्याही देशाला परवडणार नाही त्यामुळे त्यादृष्टीने देखील सरकारने विचार करायला हवा. चीन हिमनग असेल तर पाकिस्तान फक्त हिमनगाचे टोक आहे. इथे मला डॉक्टर जोशींचं वाक्य फार आवडत  ते म्हणतात - 

पाकिस्तान हा एक मुरलेला भिकारी आहे आणि त्याचबरोबर पैशांसाठी स्वेच्छेने वेश्यावृत्ती स्वीकारुन, कुणाही श्रीमंत देशाबरोबर शय्यासोबत करण्याची पाकिस्तानची वृत्ती आहे. 

इतकं चपखल वर्णन पाकिस्तानच मी आजपर्यंत वाचलं नाही.

तर मग आता करायचं काय?

१) भावना जागृत ठेवा, पण कृतीने व्यक्त करा.
२) स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आत्मसुरक्षित बनवा.
३) जागृती, शिक्षण, राष्ट्रहित आणि स्वयंप्रेरित शिस्त – ह्या गोष्टी जोपासा.
४) संवेदनशीलतेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचं एक सुजाण चक्र बनवा.

        आजचा राग, वेदना, असहायता – हे सगळं योग्य आहे. पण हे दीर्घकालीन यशाच्या शिस्तीने आणि नियोजनाने साकार करायला हवं. शत्रू केवळ सीमारेषेवर असतो असं नाही – तो आपल्या माहितीतील त्रुटींमध्ये, सायबर स्पेसमध्ये आणि आपल्या एकतेच्या कमतरतेतही असतो.

आपण सजग झालो, तरच युद्ध जिंकलं जातं – आणि सन त्झू म्हणतो तस कदाचित लढायलाच लागू नये, हेच खरे यश!

केतन सावंत



ThirdWorldWarArtofwar




Post a Comment

2 Comments

  1. तुझे विचार वाचायला नेहमीच आवडतात कारण ते कुठल्याही टोकाचे नसून अतिशय संतुलित असतात आणि त्यातून तुझी उत्तम वैचारीक बैठक आणि परिपक्वता दिसून येते.. शुभेच्छा.. तुषार सावंत

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद

      Delete