मला वाचताना गवसलेले आप्पा - गो नि दांडेकर

             खरंतर या आधी मी गो नी दांडेकर ह्या नावाशी का ओळख करून घेतली नाही ह्याची कधी कधी खंत वाटते पण आता काही अंशी ओळख झाली हे ही नसे थोडके. असो!

तर..

प्रति, 

नाव - गो नी दांडेकर

पत्ता - आत्ता कुठल्या गडावर असतील ते सांगणं शक्य नाही 

बहुधा राजगड, रायगड, राजमाची किंवा मग तळेगावी.

विषय :- पत्र लिहायला उशीर झाला त्याबद्दल माफी..

प्रिय आप्पा,

सप्रेम नमस्कार!

आप्पा तुमच्याबद्दल ऐकून होतो अर्थातच आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडूनच. वाचताना कुठूनतरी कादंबरीमय शिवकाल हे नाव अधून मधून पुढ्यात डोकावत होत. त्यावेळेस वाचनाची आवड होती पण वाचताना वेगळपण जाणवणार अस काही वाचनात येतं नव्हतं.

कादंबरीमय शिवकाल हाती आलं आणि अक्षरशः मोजक्या दिवसात ते फस्त केलं...आणि मग त्या कादंबरीपासून गोनिदा नावाचं गारुड माझ्यावर बसलं ते कायमच! जिथून शक्य होईल जे शक्य होईल तुमच्याबद्दल ते वाचत होतो. मग तर दर महिन्याला तुमची पुस्तक घेण्याचा सपाटा लावला. पवनाकाठचा धोंडी, माचीवरला बुधा, वाघरु, मृण्मयी तर मला भेटली. अहो आप्पा तुम्हाला वाटेल मी थापा मारतोय पण खरंच देवाशप्पथ मी ते पुस्तक रात्री झोपताना पण माझ्या उशाशी घेऊन झोपलो होतो आणि तुम्ही मनुताई इतक्या सुंदररित्या आमच्या समोर उभी केली की ती मला स्वप्नात न भेटली असती तर नवल.

तुकोबांचा सिनेमा पाहिला होता विष्णुपंत पागनिस ह्यांची भूमिका असलेला पण त्यानंतर मला तुकोबा आणि ज्ञानोबा कुठे भेटले असतील तर ते तुमच्या लिखाणातून.

नुकतंच दुर्गभ्रमणगाथा वाचून सम्पवलं. गडकोट फिरायचं भूत माझ्या मनांत अगदी गुडघ्यात डोकं खुपसून बसावं तस बसून होत त्याला तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या वाचनासरशी पुन्हा गडांवर धाव घ्यायची उर्मी उफाळून येतेय. लवकरच पुन्हा गडकोट भटकंती सुरू करेन! तुम्ही जिथे कुठे आहात तिथून मला आशीर्वाद द्याल. हे नक्की! काळजी घ्या. आपले बाबासाहेब आले आहेत तिथे आता पुन्हा तुमची मैफल रंगू दे! काळजी घ्या!


तुमचाच चाहता

केतन सावंत


(फोटो स्रोत - गुगल)

Post a Comment

1 Comments