![]() |
| आग्रा किल्ला |
पुरंदरच्या तहात ठरल्यानुसार शिवाजी महाराज, संभाजी महाराज दिल्लीला जायला निघाले तेव्हा राजांच्या सोबत खालील मंडळी होती.
१) निराजी राऊजी शहाणा
२) त्रिंबकजी सोनदेव, सोनाजीपंतांचे पुत्र
३) माणको हरी सबनीस
४) दत्ताजी त्रिंबक
५) हिरोजी फर्जंद
६) राघोजी मित्रा,
७) दावलजी गाडगे तसेच १००० मावळे आणि ३००० लष्कर (स्वार) अशी माहिती आपल्याला सभासद बखर सांगते.
* ५ मार्च १६६६ रोजी शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला निघाले.
* १२ मे १६६६ रोजी महाराज आग्र्याला पोहोचले. भेटीच्या दिवशी राजांना औरंगजेबाने चार तास उभं केल्याचा उल्लेख फुतुहात इ आलमगिरी ह्या ईश्वरदास ह्याने लिहिलेल्या समकालीन कागदपत्रात येतो.
मिर्झाराजाचा मुलगा रामसिंग ह्याच्या रजपूत सरदारांनी शिवाजी राजांच वर्णन केलं आहे. ती पत्र राजस्थानी रेकॉर्ड मध्ये पाहायला मिळतात त्यात साधारण संदर्भ असा कि शिवाजी महाराज फक्त १०० सोबत्यांना घेऊन आले आहेत आणि सोबत सैन्य हे २५० असावं. (आता सभासद बखरीच्या नोंदीचा विचार केला तर ह्या संख्येत तफावत जाणवते पण ह्यात जवळपास ४०० च्या आसपास फक्त राजांचे गुप्तहेर असल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे त्यामुळे एकूणच राजांसोबत बऱ्यापैकी लवाजमा होता हे मान्य करावं लागेल. आणि इतका लवाजमा घेऊन ते सुखरूप बाहेर पडले सगळ्या मंडळींसकट)
शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटणार त्या दिवशी त्याने स्वतः जवळ ५ हत्यार बाळगिली होती, जिरेमुडी नावाचे कवच सारखे घातले होते, स्वतः भोवती रांगडे हशम उभे केले होते कारण अफझलखानाचा वध त्याला पक्का ठाऊक होता. त्याच्या मनात आलं कि "शिवाजी सामान्य नाही. सैतान आहे. अफझलखान भेटीमध्ये मारला. तैसाच उडोन तख्तावरी आला आणि आपणास दगा केला तरी काय करावे?"
राजांनी सगळा मेवा हा वजिरांना पाठवला आहे असे सांगून वेळूचे पेटारे पाठवले. मग एके दिवशी राजे आणि संभाजी राजे पेटाऱ्यात बसून निघाले. हिरोजी फर्जंद यास आपला पोशाख घालून आपल्या जागी झोपवले आणि एक पोरगा रगडावयास ठेविला. (मदारी मेहतर हे नाव कुठे येत नाही). राजे आग्रा बाहेर पडल्यावर हिरोजी फर्जंद आणि तो पोरगा निघून रामसिंगाकडे गेले त्याला खरे सांगितले आणि मग निघाले((पण परिस्थिती पाहता हे घडले असल्याची शक्यता कमी कारण जितक्या लवकर आपण आग्य्रातून बाहेर पडू आणि महाराष्ट्र जवळ करू हे त्यांच्या दृष्टीने हिताचे होते). दुसरा दिवस उजाडून नऊ तास उलटले तेव्हा पहाऱ्याच्या माणसांनी आत जाऊन पाहिले असता राजे पळून गेल्याचे लक्षात आले.
राजांनी नुसतेच पळाले अशातला भाग नाही त्यासाठी त्यांनी खुद्द औरंगजेबाच्या वजिराला जाफरखानाला काही रक्कम दिल्याची राजस्थानी पत्रात नोंद आहे. आता राजांनी रामसिंगकडून ६६००० रुपये घेतले होते आणि राजगडला परतल्यावर ते पुन्हा पाठवून दिले ह्याची नोंद समकालीन कागदपत्रात सापडते. त्यामुळे अशाच प्रकारे राजांनी पैसे देऊन खुद्द औरंगजेबाची माणसं आपल्या बाजूला वळवली असण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजी राजे पळाल्याचे समजून औरंगजेबाने त्यांवर दोन लाख साठ हजाराची फौज पाठवली असे सभासद म्हणतो. पण सोबतच त्याला(औरंगजेबाला) ह्या भीतीने ग्रासलं कि शिवाजी राजे शहरातच (आग्रा) लपून बसले असतील आणि आपल्यावर रात्रीच्या समयी हल्ला करील या भीतीने त्याने स्वतःची सुरक्षा वाढवली.
राजे पेटाऱ्यातून पळाले हा फक्त एक निष्कर्ष मानला गेला कारण राजांनी जाताना मागे काडीचाही पुरावा ठेवला नव्हता. हा तर्क ३ सप्टेंबर १६६६ च्या राजस्थानी रेकॉर्ड्स च्या पत्रातून दिसतो. पण आलमगीरनामा मध्ये खुद्द औरंगजेबाचा इतिहास लिहिणारा मोहम्मद साकी मुस्तैद खान ह्याने लिहिलेल्या मासिर ए आलमगीर ह्यात लिहितो कि तो (शिवाजी) वेषांतर करून पळाला. कवी भूषणच्या छंदांमध्ये देखील राजे वेषांतर करून पळाले असाच उल्लेख येतो.
मासिर ए आलमगिरी ह्यात Shivaji Flees From Agra असा अख्खा एक भाग ह्या आग्रा प्रकरणाबद्दल लिहिलेला आहे.
मिर्झाराजा जयसिंग ह्यांनी शिवाजी राजांच्या सोबत दक्खन हुन किरत सिंग ह्याला पाठवलेले असते. किरत सिंग सलाबत खानाला म्हणतो "the visit of shivaji was on the assurance of my father. Everyone knows that my father sent him to the court(Agra). But the wish of His Majesty(Aurangzeb) appears to be otherwise). This would injure the reputation of my father. Therefore, do whatever you can to Shivajis release." ह्यावर स्लॅबत खान म्हणतो
"Small baskets of these(sweets) should be sent to the bazar to be distributed among the poor and the needy and the rest (of it) be sent to the houses of nobles (amirs) and the rajas. This process should continue for a few days. (one day he should make his escapes) sitting in one of the baskets.
कि एकच उपाय दिसतो तो म्हणजे राजांनी मिठाईचे पेटारे गरीब, श्रीमंत आणि मोठ्या सरदारांना वाटावे. असे काही दिवस चालू द्यावे. आणि एकदा का हे असे रोज होऊ लागले कि चौकी पहाऱ्यावरच्या सैनिकांना संशय येणार नाही आणि मग एका दिवशी राजांनी त्याच पेटाऱ्यात बसून जावे.
पण औरंगजेबाला पाहता कुठलाही सरदार असा सल्ला राजांना देणं शक्य नाही. अगदी मिरझाराजाचा मुलगा देखील नाही. एकवेळ ते तम्ही इथून बाहेर पडा एवढंच सांगू शकतील. कारण राजाला पळण्यात आपण मदत केली हे जर औरंगजेबाला कळलं तर आपली गर्दन मारली जाणार हि काळ्या दगडावरची रेघ होती.
कितीही अशक्य कोटीतील वाटणारी हि गोष्ट राजांनी शक्य दाखवली. राजांच्या भोवती पहारे होते. फौलाद खानाचे. मासिर ए आलमगिरी मध्ये सांगितल्या प्रमाणे औरंगजेबाने फौलादखानाला ५००० फौज घेऊन पहारा बसवायला सांगितलं होत.
![]() |
| छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब भेट १२ मे १६६६ |
राजे पळाल्याची खबर मिळाल्यावर रागाने औरंगजेबाने मिर्झाराजांच्या मुलाची मनसब काढून घेतली अथवा कमी केली ह्याबद्दल नेमका अर्थ कळत नाही. पण सुटल्यावर राजे जंगल आणि मैदान ओलांडून 'राजगडावर' आल्याचा उल्लेख फुतुहात इ आलमगिरी, Hisoty of Aurangzeb ह्यात येतो.
Hisoty of Aurangzeb ह्यात जदुनाथ सरकार लिहितात कि राजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं आणि मिठाई चे पेटारे रोज वाटपासाठी बाहेर जाऊ लागले आणि मग असेच एक दिवस राजे स्वतः आणि संभाजीराजे असे दोन पेटाऱ्यात बसून पसार झाले. Hisoty of Aurangzeb ह्यात जदुनाथ सरकारह्यांनी राजांची पळण्याची तारीख १९ ऑगस्ट दुपार नंतर राजे पळाले असे सांगितले आहे. मासिर ए आलमगिरी मध्ये देखील १९ ऑगस्ट हीच तारीख येते. राजस्थानी रेकॉर्ड्स मध्ये हि तारीख १८ ऑगस्ट येते. शककर्ते शिवराय ह्या विजयराव देशमुख लिखित ग्रंथात तारीख १७ ऑगस्ट १६६६ अशी येते. आता हीच तारीख जास्त ग्राह्य असण्याची कारण पुढीलप्रमाणे
> १७ ऑगस्ट १६६६ ह्या दिवशी शुक्रवारचा दिवस होता. म्हणजेच मुसलमानांचा नमाज पढण्याचा दिवस. अशातच साधारण दुपारी चारच्या सुमारास जेव्हा बऱ्यापैकी पहारे ढिले झाले असतील त्याचवेळी राजे निसटले असण्याची दाट शक्यता आहे.
> फिदायी हुसेन ची कोठडी पूर्ण झाली होती आणि राजांना तिथे नेऊन ठार मारणार हि योजना राजांच्या हेरांनी त्यांना आधीच कळवली होती.
> राजे पळून गेल्याच्या दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी दहाच्या सुमारास नेहमीची हालचाल, माणसांची ये जा डसली ह्यावरून संशय येऊन आत जाऊन पाहिले असता राजे पळून गेल्याचे लक्षात येते. आता अधिकृत रीत्या जर राजस्थानी रेकॉर्ड्स मध्ये नोंदवल्याप्रमाणे जर १८ तारीख पकडली तर एक दिवस आधी म्हणजे १७ तारखेला राजे निसटून गेल्याचे स्पष्ट होते.
* राजे पेटाऱ्यातून पळून गेले कि वेषांतर करून पळून गेले ह्याबद्दल अजून खात्रीलायक विधान कुणीच करू शकलं नाही कारण समकालीन आणि उत्तरकालीन साधनात वेगवेगळे संदर्भ आलेले आहेत.
![]() |
| १७ ऑगस्ट १६६६ च्या शुक्रवार दिवशी दुपारी ४ चा सुमार राजे निसटले |
तर एकूणच राजे आग्र्याच्या कैदेतून निसटणे हि जगजाहीर गोष्ट आहे. पण अशाप्रकारे आपल्या सोबत आलेल्या माणसांसोबत, जनावर ह्यांना घेऊन एकही जीव मृत्यू न पावता सुखरूप आपल्या मायदेशी परत येणं हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू जाणे.
=================================================================
संदर्भ -
१) सभासद बखर - पृष्ठ ४७, ४८, ५४, ५५
२) छत्रपती शिवाजी - सेतुमाधवराव पगडी - पृष्ठ ६८, ७१
३) मासिर ए आलमगीर - पृष्ठ ३६,३७,३८
४) फुतुहात इ आलमगिरी - पृष्ठ ८८, ८९, ९०
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)



0 Comments