छत्रपती संभाजी महाराज - एक अपराजित योद्धा
सकल राजकार्यधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा पराक्रम अतुलनीय आहे. हे आपण सारेच जाणतो. त्यांच्याबद्दल ससंदर्भ माहिती हवी असल्यास डॉ जयसिंगराव पवार आणि डॉ कमल गोखले यांनी लिहिलेली पुस्तक वाचावीत. आपला इतिहास हा आपल्यालाच वाचावा लागणार आणि पुराव्यासहित अभ्यासून तो पुढच्या पिढीच्या शिदोरीत बांधून द्यावा लागणार तरच त्यांना आपल्या इतिहासाची गोडी लागेल, कुतूहल निर्माण होईल, आवड निर्माण होईल.
छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया खरच वाखाणण्याजोग्या आहेत. त्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर फोंड्याच्या लढाईच देता येईल. गोव्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्यावर तेव्हा येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे दोघे होते. १-११-१६८३ रोजी फिरंग्यांनी किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ल्यावर मारा सुरु केला. तोफांचा भडीमार केल्याने किल्ल्याला भगदाड पडलं, आत किल्यात कुमक कमी पण हिमंत भरपूर त्याच हिमतीच्या जोरावर ते लढत होते. राजापुरात छत्रपती संभाजी महाराज तळ ठोकून होते. फोंड्याच्या किल्ल्यावर फिरंग्यांचा हल्ला झाल्याचं कळताच ते विजेच्या गतीने निघाले. संभाजी महाराजांच्या यशाचं एक मोठं गमक म्हणजे ते प्रचंड वेगाने यायचे. पोर्तुगीजांच्यासमोर संभाजीराजांनी ८०० स्वारांच्या संरक्षणाखाली आपले ६०० शिपाई किल्ल्यात घातले पायदळाच्या दोन्ही बाजूचं घोडदळाच्या तुकडी शिस्तीने किल्ल्यात चालली होती. जे ६०० सैनिक फिरंग्यांच्या नजरेसमोरून किल्ल्यात गेले त्यांना अडवण्याची ताकद एकही फिरंग्याला झाली नाही. *
समोरून साक्षात रुद्र तांडव करत आपल्या मदतीला येतोय हे दिसल्यावर किल्ल्यातल्या मावळ्यांना सहस्त्र हत्तीचं बळ आलं. बाहू तटतटून फुगले. तलवारीच्या मुठी करकचून आवळल्या गेल्या आणि मग एकच लांडगेतोड झाली. इंग्रजांना माघार घेणं भाग पडलं. ते धूम ठोकून पळू लागले. ते पाहताच संभाजी महाराजांचा पारा चढला आणि ते आपल्या घोड्याने त्यांचा पाठलाग करू लागले. मांडवी नदीतून इंग्रज पळतात हे पाहून राजांनी आपला घोडा पाण्यात घातला पण नदीला पूर असल्याने घोडा पोहणीला लागला तेव्हा लागलीच खंडो बल्लाळ ( बाळाजी आवजी चिटणीस ह्यांचा सुपुत्र ) ह्याने घोडा आणि राजांचा दोघांचा जीव वाचवला.
पण ह्या लढाईत येसाजी कंक ह्यांचा पुत्र कृष्णाजी कंक जखमी झाला आणि त्यात तो मरण पावला त्यासंबधी संभाजी राजांनी एक पत्र लिहिलं आहे ते खाली दिल आहे. - लढाईत थोर पराक्रम गाजवला म्हणून येसाजी कंक ह्यांस १००० होन आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक ह्यास १००० होन बक्षीस दिले तसेच कृष्णाजीचा मुलगा चाहुजी कंकला सुभा देऊन कारभार चालवायला सांगितले -
हे शिवपुत्र संभाजी पुस्तक वाचवायचे असल्यास खाली दिलेल्या चित्रावर क्लिक करून विकत घेऊ शकता.
संदर्भ -
१)ऐतिहासिक पत्रबोध - मराठेशाहीतील निवडकपत्रे - गो स सरदेसाई पृष्ठ १५ - (हे पत्र राजवाडे खंड १५ लेख ३६५ मध्ये छापले आहे.)
२) शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले - पृष्ठ ७९, ८०
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)



0 Comments