June 02, 2022

 खरंतर या आधी मी गो नी दांडेकर ह्या नावाशी का ओळख करून घेतली नाही ह्याची कधी कधी खंत वाटते पण आता काही अंशी ओळख झाली हे ही नसे थोडके. असो!


तर..



प्रति, 

नाव - गो नी दांडेकर

पत्ता - आत्ता कुठल्या गडावर असतील ते सांगणं शक्य नाही 

बहुधा राजगड, रायगड, राजमाची किंवा मग तळेगावी.


विषय :- पत्र लिहायला उशीर झाला त्याबद्दल माफी..


प्रिय आप्पा,

सप्रेम नमस्कार!


आप्पा तुमच्याबद्दल ऐकून होतो अर्थातच आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडूनच. वाचताना कुठूनतरी कादंबरीमय शिवकाल हे नाव अधून मधून पुढ्यात डोकावत होत. त्यावेळेस वाचनाची आवड होती पण वाचताना वेगळपण जाणवणार अस काही वाचनात येतं नव्हतं.


कादंबरीमय शिवकाल हाती आलं आणि अक्षरशः मोजक्या दिवसात ते फस्त केलं...आणि मग त्या कादंबरीपासून गोनिदा नावाचं गारुड माझ्यावर बसलं ते कायमच! जिथून शक्य होईल जे शक्य होईल तुमच्याबद्दल ते वाचत होतो. मग तर दर महिन्याला तुमची पुस्तक घेण्याचा सपाटा लावला. पवनाकाठचा धोंडी, माचीवरला बुधा, वाघरु, मृण्मयी तर मला भेटली. अहो आप्पा तुम्हाला वाटेल मी थापा मारतोय पण खरंच देवाशप्पथ मी ते पुस्तक रात्री झोपताना पण माझ्या उशाशी घेऊन झोपलो होतो आणि तुम्ही मनुताई इतक्या सुंदररित्या आमच्या समोर उभी केली की ती मला स्वप्नात न भेटली असती तर नवल.


तुकोबांचा सिनेमा पाहिला होता विष्णुपंत पागनिस ह्यांची भूमिका असलेला पण त्यानंतर मला तुकोबा आणि ज्ञानोबा कुठे भेटले असतील तर ते तुमच्या लिखाणातून.


नुकतंच दुर्गभ्रमणगाथा वाचून सम्पवलं. गडकोट फिरायचं भूत माझ्या मनांत अगदी गुडघ्यात डोकं खुपसून बसावं तस बसून होत त्याला तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या वाचनासरशी पुन्हा गडांवर धाव घ्यायची उर्मी उफाळून येतेय. लवकरच पुन्हा गडकोट भटकंती सुरू करेन! तुम्ही जिथे कुठे आहात तिथून मला आशीर्वाद द्याल. हे नक्की! काळजी घ्या. आपले बाबासाहेब आले आहेत तिथे आता पुन्हा तुमची मैफल रंगू दे! काळजी घ्या!


तुमचाच चाहता

केतन सावंत



(फोटो स्रोत - गुगल)



December 04, 2020

आज एक छान पुस्तक वाचनात आलं. इतिहासामध्ये कै निनादराव बेडेकर म्हणतात तशा बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत ज्या कधी आपल्यासमोर आल्याचं नाहीत (बहुधा येऊ दिल्या नाहीत?) . पण ह्याला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात आपण देखील जबाबदार आहोत. सत्याला नाकारून उगाच दुसऱ्याला त्रास म्हणून खोट्या गोष्टी आयुष्यभर उराशी कवटाळून बसतो आणि पुढच्या पिढीला देखील तेच शिकवतो. 

थोरल्या राजांनी कधी दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखलं नाही कि कधी मुद्दाम त्रास दिला नाही पण आपल्या धर्माच्या झालेली हानी भरून काढण्यासाठी जबरदस्तीने लादलेली धर्मांतर, देवळं पाडून बांधलेली मशिदी ह्या सगळ्याचा त्यांनी कडाडून विरोध केला पण त्याच बरोबर त्यांना जशास तसा धडा शिकवला. सपेत्तीपेरुमल इथे देवळं पडून बांधलेल्या मशिदी पाडून पुन्हा देवळं बांधली, गोव्यात पोर्तुगीजांनी जबरदस्तीने चालवलेल्या धर्मांतराला त्यांनी पोर्तुगीजांच्या चार पाद्र्यांची मुंडकी त्यांच्या विजरई कडे पाठवून उत्तर दिल. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना ठायी ठायी सापडतात. 

पुढे काही नोंदी आपण पाहणार आहोत त्या मिर्झा राजा जयसिंग हा दिलेरखानासोबत स्वराज्यावर चालून आला १६६५ साली तेव्हा राजे आणि  मिर्झा राजाच्या मध्ये झालेल्या गोष्टींचा भाग आहे. 

१) "this king is a very virtuous Hindu"

- " हा एक सद्गुणी हिंदू राजा आहे. 

२) "As you have restored and defended the overthrown Hindu religion, I am pleased with you"

- "आपण उध्वस्त झालेल्या हिंदू धर्माला पुन्हा उभं केलं आणि त्याच संरक्षण केलंत म्हणून मी तुमच्यावर खुश आहे"

(वरील दोन्ही गोष्टी मिर्झा राजाच्या मुखातल्या आहेत.)


"In his early activities, he exhibited some aggressive spirit against the Muslim faith & pull down certain mosques at kalyana and bhiwandi and imprisoned mullas there" 

"त्याने (शिवाजीने) त्याच्या सुरुवातीच्या काळात (१६५०-१६६० दरम्यान) कल्याण भिवंडी इथल्या काही मशिदी पाडल्या आणि तिथल्या मौलवींना कैद केलं. 



संदर्भ - 

1) The Deliverance or the Escape of Shivaji the Great from Agra - Rao Saheb G K Alias Babasaheb Deshpande

2) Maharashtra of the Shivshahi Period  - V. S. Bendre

- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

November 20, 2020

फोटो स्रोत - गुगल 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयातला एक महत्वाचा भाग म्हणजे त्यांचं नियोजन:

१) सुरतेवर दुसऱ्यांदा स्वारी केली तेव्हा राजांनी तंबू देखील वापरले नव्हते. ते तसेच जमिनीवर बसले होते असे एका डच गुप्तहेराने सांगितले. 

२) राज्याभिषेकानंतर जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहीम निघाली त्यावेळेस देखील राजांनी फक्त दोन तंबू वापरले - एक स्वतः साठी आणि दुसरा मंत्र्यांसाठी. 

३) जॉन फ्रायर हा म्हणतो कि शिवाजीच्या छावणीत नर्तकी आणि वेश्या ह्यांना बंदी होती. (कुठलीही स्त्री छावणीत अथवा आपल्या सोबत सैन्यात आणण ह्याला बंदी होती)

४) मराठा सैन्याचं यश कशामुळे आहे तर - कडक शिस्त, उच्च नेतृत्व गुण, आणि राजांनी एकदा सांगितल्यावर का? विचारायचं नाही म्हणजेच डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि सोपवलेली कामगिरी पार पाडायची हि त्रिसूत्री. 

आता खाली दिलेली गोष्ट वाचण थोडं मजेशीर आहे -

ह्या पुस्तकात लेख म्हणतो कि शिवाजीने त्याच्या लोकांसाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मराठा पादशाही (मराठा साम्राज्य) पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे धर्म राज्य आहे हि भावना. (इथे सगळं चांगलंच होणार) कोणावरही अन्याय होणार नाही.  स्वतः पदवी धारण केली - गो  ब्राम्हण प्रतिपालक (गायीचं रक्षण करणारा) आणि गायीचं रक्षण हे हिंदूंचं सर्वोच्च कार्य आहे. 


राज्याचे सार ते दुर्ग - असं अमात्य आज्ञापत्रात सांगतात -

सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटल्यावर राजांनी एक महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे गडांच्या संरक्षणासाठी एक भली मोठी रक्कम बाजूला करून ठेवली. जिला आपण आज Reserve Fund म्हणतो. पुढे एका ठिकाणी गडांच्या डागडुजीसाठी जवळपास एक लाख सत्तर हजार होन १,७०,०००/- रक्कम वापरली असल्याची नोंद आहे ती यादी खाली दिली आहे. (१ होन - ३/३.५ रुपये)


संदर्भ - 

१) The Military System of Marathas - Surendranath Sen


- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

November 14, 2020



जेम्स डग्लस ह्या परदेशी व्यक्तीच्या नजरेतून रायगड पाहूया. 

Bombay and Western India ह्या त्याच्या पुस्तकात त्याने बऱ्याच नोंदी करून ठेवल्या आहेत. नोंदी म्हणजे अगदी तपशीलवार छोट्यातली छोटी गोष्ट सुद्दा त्याने नमूद केली आहे. काही गोष्टी त्याने विभागणी केली आहे त्यानुसार आपण पाहूया. 

पाचाड आणि तिथल्या पायऱ्या :-

पाचाडला एक रात्र आम्ही रामस्वामी मंदिरात राहिलो. एक घुबड मध्येच ओरडून गेलं. इथे एकेकाळी १०,००० घोडे बांधले जायचे. पाचाड हि गडावरची जुनी पेठ. इथे सगळीकडून माल यायचा, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी व्हायची. 

रायगडावरील बांधकाम :-

तो म्हणतो शिवाजी राजांच्या काळात त्यावेळी रायगडावर जवळपास ३०० दगडांची घर होती आणि एकूण मिळून दोन हजारच्या आसपास मनुष्यवस्ती गडावर होती. इथे अशा अनेक इमारती होत्या जसे कि प्रशासकीय इमारती जिथून प्रशासकीय काम चालायची, टाकसाळ, भली मोठी बाजारपेठ होती ज्याच्या खुणा (खांब) आपण आजही पाहू शकतो.  

रायगडावरून दिसणारं दृश्य :-

तोरणाच्या पाठून सूर्य उगवतोय. इथे पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण सगळीकडे डोंगरांशिवाय काहीच दिसत नाही. आमच्या पायाशी महाड आहे जिथे शिवाजीने त्याच्या तारुण्याचे बरेच दिवस घालवले. (इथे पुणे असा उल्लेख असायला हवा होता). इथे तो एक मजेशीर गोष्ट सांगतो ती अशी - शिवाजीचे कान खूप तीक्ष्ण होते आणि जे आपण पाहू शकतो त्याच्या कितीतरी पुढच त्याला कळायचं. एके रात्री तो (शिवाजीराजे) झोपले असताना अचानक जागे झाले आणि म्हणाले जंजिऱ्याच्या दंडाराजपुरीजवळ काहीतरी वाईट घडलं आहे. हे सत्य होत. तिथे दारूचा मोठा स्फोट झाला होता आणि तो प्रदेश शत्रूने (सिद्धी) घेतला होता. राजपुरी (दंडाराजपुरी) हे रायगड पासून २० मैल दूर आहे. 

शिवाजीराजांनी रायगड का निवडला :-

फोटो स्रोत - गुगल 
रायगड हा त्यांना जहागिरीत मिळालेला किल्ला नाही. तो त्यांनी लढून मिळवला साधारण १६६२ ते १६६४ च्या आसपास (१६५४ ते १६५६ च्या आसपास जावळी घेतली तेव्हा रायरी मिळाला). तो (जेम्स) असं म्हणतो कि शिवाजीराजांकडे खूप किल्ले होते खरं म्हणजे ते गेला तेव्हा त्यांच्यापाठी १५० किल्ले होते (पण खुद्द शिवाजीराजांच्या तोंडच वाक्य आहे - आज हजरतीस ३६० दुर्ग आहेत.) 

इंग्रजी दूतावास :- 

चार्ल्स दुसरा ह्याच्या काळात जेव्हा जनरल ऑन्गीर हा मुंबईचा गव्हर्नर होता तेव्हा त्याच्या देखरेखीखाली एक शिष्टमंडळ रायगडला शिवाजीच्या राज्याभिषेकासाठी पाठवण्यात आलं ज्यात हेन्री ऑक्झिण्डन आणि इतर दोन इंग्रजी अधिकारी होते. छोट्या बोटीतून मुंबई सोडल्यावर सहाव्या दिवशी ते पाचाड, चौल येथे आले.  

त्यांनी( हेन्री ऑक्झिण्डनने तिथे कसा वेळ घालवला :-

इथे तो म्हणतो कि हेन्री ऑक्झिन्डच्या मते शिवाजीला रामायण माहीत होत आणि त्यातल्या काही ओव्या तो सतत गुणगुणत असायचा. जर हे त्याला येत नसत तर हि एक लाजिरवाणी गोष्ट असती कारण रामायण लिहिणारा वाल्मिकी हा भारतीय कवीच होता. 




संदर्भ - 

१) Bombay  and Western India  - २


- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  

November 06, 2020

                सध्या आपल्याकडे "सेक्युलर" हा शब्द खूप ऐकू येतोय. त्यात छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते. त्याच बरोबर औरंगजेब कसा उदारमतवादी होता, स्वतःच्या धर्माप्रमाणेच इतर धर्मांचा आदर करणारा होता हे अगदी छातीठोकपणे सांगत फिरतात पण पुरावा मागितला कि शेपूट घालून पळत सुटतात. मागच्या भागात इथे आला देवळावर घाला   आपण पाहिलं कि कशाप्रकारे आपल्या देवळावर ह्या औरंगजेबाने घाले घातले आज त्याचाच पुढचा  भाग आपल्याला पाहायचा आहे. 

आता खाली जे चित्र आहे ते मासिर ए आलमगीर ह्या खुद्द औरंगजेबावर त्याच्याच माणसाने लिहलेला ग्रंथातील भाग इथे देतो आहे ज्याचं भाषांतर जदुनाथ सरकार यांनी केलं आहे. 

मासिर ए आलमगीरी पृष्ठ १२०


ह्याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे :-

'अबू तुरब ज्याला अंबर इथली देवळं उध्वस्त करायला  पाठवलं होत तो १०ऑगस्ट रोजी दरबारात हजर झाला आणि त्याने सांगितलं कि त्याने ६६ देवळं पाडली.'


आता हिंदूंची देवळं पाडण्याचं काय कारण? काहीच नाही. फक्त आपला इस्लाम साऱ्या जगभर मानला गेला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्ती मुसलमान झाली पाहिजे इतका तो कट्टर आणि क्रूर धर्मवेडा होता. केशवराय इथलं देऊळ पाडल्यावर तिथल्या छोटा मोठ्या ज्या देवतांच्या मुर्त्या होत्या त्या त्याने आग्र्याला आणवल्या आणि बेगम साहिब म्हणून बांधत असलेल्या मशिदीच्या पायऱ्यांमध्ये पुरून टाकल्या.


२१ सप्टेंबर १६८१ रोजी औरंगजेब महाराष्ट्रात म्हणजेच दख्खन मध्ये यायला निघाला तेव्हा त्याने जवाहर चंद ह्या आपल्या अधिकाऱ्याला फर्मान पाठवलं कि आता अजमेर वरून आम्ही दख्खनमध्ये जायला निघतोय तेव्हा वाटेत दिसणार एकही देऊळ आमच्या दृष्टीस पडता कामा नये. काशी विश्वनाथ, जगन्नाथ, सोमनाथ, केशवराय आणि किती म्हणून नाव सांगता येतील. फक्त आपल्या क्रूर स्वार्थापोटी त्याने आपली स्वर्गाहून सुंदर अशी मंदिर पाडली. अगदी सोन, चांदी, तांब, पितळ ह्यांनी मढवलेल्या मुर्त्या त्याने फोडल्या. 


आता दिवाळी जवळ आली म्हणून जाता जाता एक शेवटचं सांगतो. (अजून बरच आहे सांगण्यासारखं)

औरंगजेबाने फटाके फोडायला बंदी केली होती. हो बरोबर वाचलं तुम्ही. हे फर्मान त्याने जमाँदत उल मुल्क ह्याला एक फर्मान लिहायला सांगितलं. जे त्याने सगळ्या परगण्यांना पाठवलं ज्यात तो असं फर्मावतो को फटाके फोडायला बंदी लागू केली आहे. तसेच फुलादखानला (हा  बहुतेक तोच शिवाजी महाराज आग्र्यात असताना ह्याच्याच पहाऱ्यातून पळाले होते) सांगितलं कि संपूर्ण शहरात दवंडी पिटवून फटाके फोडायला बंदी असल्याची माहिती द्यायला सांगितली.  २२ नोव्हेंबर १६६५ रोजी गुजरातच्या सुभेदाराला पाठवलं होत ज्यात तो (औरंगजेब) असं म्हणतो कि हिंदू त्यांच्या श्रद्धेनुसार दिवाळी साजरी करतात. (श्रीरामांनी रावणाचा वध केला वनवासातून परत आले आणि ते वनवासातून परत आले म्हणून हिंदू दिवाळी साजरी करतो) पण आता कुणीही दिवाळी साजरी करायची नाही. खाली फर्मान देतोय... 


हे फर्मान Aurangzeb As He Was according to Mughal Records ह्या पुस्तकातून घेतलं आहे. 

संदर्भ - 


१) मासिर ए आलमगिरी 

२) Aurangzeb  as he was as per Mughal Records 


- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)  


November 03, 2020

_*प्रतापगडावरचा रांजण*_


कोयनेच्या खोऱ्यात आणि पार गावात आज धामधूम सुरु होती. कारण तस होत. अफझलखान मारल्यावर राजे राजगड मग तिथून पन्हाळा तिथून विशाळगड आणि आज किती महिन्यांनी भवानी आईच्या दर्शनाला येणार होते.

"आरं बिगी बिगी हात चालवा रं, राजं कवा बी येत्याल! आरं ये रंडीच्या ऐकतो का न्हाई!त्यो झेंडू ठिव बगू तिथं!" किल्लेदार सिधोजीराव सगळ्यांवर ओरडत होते. राजे राजगडाहून पहाटेच निघाले त्याची तोफ त्यांनी ऐकली तशी त्यांची चलबिचल अजून वाढली.

गडावर आज माणसं जमू लागली. सावकार, उदीम व्यापारी साऱ्यांनाच राजांना एकदातरी पाहावं असं झालं होत. अफाट देहाच्या त्या राक्षसाला दे माय धरणी ठाय करणारा राजा दिसतो तरी कसा हे पाहण्याची ओढ लागली होती. फक्त तेच नाही गावातली बाई बाप्ये, म्हातारे, पोरांना तर लंगोट बांधून असाच घेऊन आले होते. पार गावाहून ते थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत दुतर्फा लोक दाटी करून उभे होते.

पसरणीच्या घाटात धुळीचे लोट उठू लागले तसे सगळ्यांची चुळूबुळ चालू झाली. जो ओट एकमेकाला त्या दिशेने बोट करून दाखवू लागला

"राजं आलं राजं आलं" साऱ्यांच्याच चेहऱ्यावर एक आनंदाची लकेर उमटली. आणि धुळीचे लोट अगदी गावात शिरले तसे राजे थांबले. घोड्यावरून उतरले पाठोपाठ तानाजी, मोरोपंत हे देखील उतरले. तानाजीने पुढे होऊन राजांच्या घोड्याचे लगाम हाती घेतले. आजूबाजूला जमलेली गर्दी हि फक्त राजांच एकवार दर्शन घडावं त्याने आपल्याला बघावं म्हणून झाली होती. आणि राजे चालू लागले. सुवासिनींनी राजांना ओवाळलं.

बहुतां दिसांची आस पुरी झाल्याच्या भावना साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. किल्लेदार लगबगीने पुढे आला. महादरवाजा जवळ जाताच राजे थांबले आणि त्यांनी पुन्हा एकदा शामियाना उभारल्याच्या दिशेने नजर वळवली आणि गर्रकन फिरून ते आत गेले. थोड्यावेळात मोरोपंत आणि नेतोजी पालकर येऊन दाखल झाले. "काय मनसुबा पंत?"
"राजे आम्हाला थोडे बोलायचे होते!"
"बोला पंत..इजाजत कसली!"
"राजे ते भुयार...!"
"ते बुजवून टाका...खानाचा मुडदा त्यात घातला तेच ना"
"होय होय तेच"
शामियान्याच्या मागल्या अंगाला राजांनी एक भुयार खोदून घेतलं होतं ते थेट महादरवाजाच्या उजव्या अंगाला खुल होत होतं. खानाला मारल्यावर राजे त्याच भुयारातून गनिमाला न दिसता थेट किल्ल्यात पोहोचले होते. 

"सरनौबत.. येक गोष्ट ध्यानी आली नाही वाटतं आपल्या?"
"कंची राजं?"
"तो रांजण...आधी बाहेर काढून घ्या"
मोरोपंत दोघांच्याही चेहऱ्याकडे पाहत होते.
"पंत आपणास ठावे नाही. पण भेटीच्या आदल्या दिवशीच भुयाराचे तोंड महादरवाज्यापाशी उघडताच तीत येक भला मोठा रांजण गावला. काय आहे आत ते ठावे नाही परंतु गडबडीत त्याचा निर्णय घेणे राहून गेले. म्हणून मग लगोलग आलो"
"आलं ध्यानी राजं"
"भोई पाठवून रांजण मागवून घ्या. आणि भवानीच्या देवळासमोर घेऊन या. आम्ही तिथेच भेटू तुम्हास!"
"जी राजं"

रांजणाच्या तोंडाच्या दोन्ही बाजूस कडीतून पितळेची सळई घालून तोंड गच्च बंद केलं होतं. राजांनी एकदा चहुबाजूंनी रांजण पाहिला आणि उपाध्यायांनी दिलेलं हळद कुंकू त्यावर अर्पण केलं. मग राजांच्या आज्ञेनुसार हातोडीने दोन्ही सळ्या काढून टाकल्या आणि लख्ख पिवळा धम्मक प्रकाश साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला. 
"राजे शुभ शकुन" उपाध्याय म्हणाले
"जी...भेटीच्या आदल्या रात्रीच आई भवानीने हा प्रसाद दिला. परंतु प्रसंग असा बाका गुदरला होता की यावर विचार करण्यास सोय नव्हती. राजांनी त्यात हात घालून ओंजळभर सुवर्ण मोहोरा हाती घेतल्या आणि तसेच ते देवळात गेले. त्या मोहरा त्यांनी आई भवानीवर उधळल्या. "आई तूच येश दिलेस. पोराच्या मनीच गुज तू जाणलेस आन हा प्रसाद दिलास. आई हे येश तुज अर्पण. मी फक्त निमित्य! आई आई..आणि राजांची समाधी लागली. दोन्ही हात जोडल्या स्थितीतच राजे औट घटका बसले, मग पुन्हा सदरेवर येऊन त्या मोहरांचा विनियोग सांगितला आणि येक रात्र गडावर राहून पुन्हा राजांची घोडी राजगडाच्या दिशेने उधळली...!

©केतन सावंत

October 30, 2020

सध्याच्या असलेल्या भारताचे मूलनिवासी असलेल्या सनातन धार्मिकांनी बांधलेली अनेक देवळं परकीय आक्रमकांनी तोडली. अक्षरश ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्यासाठी स्वतःला बिरुद लावून घेतली. बुतशिकन आणि कुफ्रशिकन. 

हजारोंच्या संख्येने असलेली हिंदूंची देवळं नामशेष झाली तर काहींना उध्वस्त करून त्याजागी मशिदी बांधण्यात आल्या. किती म्हणून मशिदी बांधल्या. किती म्हणून आराध्यांच्या पवित्र धार्मिक स्थळांवर हातोडा चालला. काशीविश्वेश्वर, सोमनाथ... कितीएक मुर्त्या फोडल्या. यवनांची धाड आली कि मूर्ती उचलावी आणि लपवून ठेवावी हे नित्याच झालं होत पण ह्यास विरोध झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. त्यांनी कधीच नवीन मशिदी बांधल्या नाहीत. पण पूर्वापार चालत असलेल्या मशिदीची वर्षासन तशीच चालू ठेवली. उलट आपली देवल तोडून मशीद बांधली तिथे पुन्हा ती मशीद तोडून देवळ बांधायला लावली. (उदाहरणार्थ - सपेत्तीपेरुमल इथे असलेली देवळ)

आता एक पाहूया ते आपल्या महाराष्ट्रातच पुण्याजवळ घडलेली गोष्ट. पुणे जिल्ह्यात घोडे गावी असलेल्या मशिदीत एक फारसी  आहे. त्यात ज्याने तो खोदवला तोच म्हणतो कि हि मशीद बांधण्यासाठी मी ३० (तीस) देवळ  तोडली. म्हणजे किती उघडपणे आपल्या धर्माचा वृथा अभिमान बाळगून हे लोक हिंदू धर्माला हीन समजत होते आणि त्याच्या नाशासाठी सतत प्रयत्नशील होते. लेख खोदविणाऱ्याला घोडनदी हे नाव आवडत नसल्याने वा दुसऱ्याकाही कारणाने त्याने त्या नदीला खराब हे नाव दिले आणि त्या जागेला खराबाबाद. फारसी मध्ये खर म्हणजे गाढव आणि खराब म्हणजे गाढवाचे मूत. ह्या नदीस घोडनदी पेक्षा हि गाढवाच्या मुताची नदी म्हणून त्या गावाला खराबाबाद हे नाव दिले. 

संदर्भ - मुस्लमानकालीन महाराष्ट्र - ग ह खरे - पृष्ठ - ४४

- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)